मेंढपाळांचे स्थलांतर रोखण्यासाठी अर्ध बंदिस्त मेंढीपालन योजनेचा प्रकल्प अहवाल सादर करा

मंत्रालयातील आढावा बैठकीत ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश

कृषी मंत्री दत्ता भरणे, आ. अडसड यांची बैठकीला उपस्थिती

मुंबई, दि. 9 : राज्यातील मेंढपाळांची भटकंती थांबविण्यासाठी अशा मेंढपाळांची माहिती जमा करून प्रायोगिक तत्वावर अर्धबंदिस्त पद्धतीने मेंढीपालन प्रकल्प योजना राबविण्यासाठी अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिले. 

 राज्यातील मेंढपाळांच्या भटकंती व स्थलांतराच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे, आमदार प्रताप अडसड, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन, पुण्यश्लोक अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शीतलकुमार मुकणे,  अमरावती मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे आदि उपस्थित होते.

महाराष्ट्रातील बहुतांश मेंढपाळ मेंढीपालन व्यवसायासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्यामुळे त्यांना शिक्षण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी जीवितहानीच्या घटनाही घडतात. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिले.

प्रकल्प अहवाल सादर करा

यावेळी प्रामुख्याने एका ठिकाणी अर्धबंदिस्त पद्धतीने मेंढीपालन करण्याच्या संकल्पनेवर चर्चा करण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावर अर्धबंदिस्त मेंढीपालन व्यवसाय सुरू करण्याबाबत अभ्यास अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.अहवाल प्राप्त झाल्यानंतर अर्धबंदिस्त शेळी व मेंढीपालनासाठी आवश्यक पुढील उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मेंढपाळांसाठी राजे होळकर महामेष योजना...

सध्या ‘राजे होळकर महामेष योजना’ अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना मेंढपाळ बचत गट किंवा सहकारी संस्थांना सामूहिक स्वरूपात दिल्यास एका ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करता येतील.  त्यामुळे मेंढपाळांचे वारंवार होणारे स्थलांतर कमी होऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले.कृषी मंत्री दत्ता भरणे यांनीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ooo

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!