परळी वैजनाथ: धर्मापुरीत गांज्याचा साठा उघड; 9.77 लाखांचा मुद्देमाल जप्त
परळी वैजनाथ, दि. 11: पुढारी वृत्तसंस्था.....
परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 20 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 9 लाख 77 हजार 320 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख बाबुलाल शेखलाल अत्तार (वय 55, रा. धर्मापुरी, ता. परळी) व वसीम बाबुलाल अत्तार (रा. धर्मापुरी, ता. परळी) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. धर्मपुरी येथील त्यांच्या राहत्या घरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 11 जून रोजी सायंकाळी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका पांढऱ्या पोत्यात ठेवलेला उग्र वास येणारा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर तो 20 किलो 340 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी धनराज जारवाल यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थाची विक्री केल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात कलम 20 व 29, एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा