सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव...
राजेवाडीच्या सुपुत्राच्या कल्पकतेला राष्ट्रीय मान्यता; प्रा. डॉ. परमेश्वर गडकर यांना डिझाईन पेटंट
अंबाजोगाई प्रतिनिधी...
संशोधन, नावीन्य आणि सर्जनशीलतेचा संगम घडविणाऱ्या एका उल्लेखनीय कामगिरीची नोंद झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मौजे राजेवाडी गावचे भूमिपुत्र प्रा.डॉ.परमेश्वर संभाजी गडकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नीत समाज शिक्षण मंडळ संचलित अम्रतेश्वर महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विविध विषयांवर शोधनिबंध संदर्भ ग्रंथ, क्रमिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विकसित केलेल्या "ॲटोमेटेड इकॉनॉमिक ट्रेंड ॲनालीसीस डीव्हाईस" या अभिनव डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाकडून (CGPDTM) अधिकृत डिझाईन पेटंट मंजूर झाले आहे. या मान्यतेमुळे त्यांच्या डिझाईनला कायदेशीर संरक्षण मिळाले असून, नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रात त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची दखल मिळाली आहे.
प्रा.डॉ.परमेश्वर गडकर यांनी दीर्घकाळाच्या अभ्यास, संशोधन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हे डिझाईन विकसित केले. त्यानंतर भारतीय पेटंट कार्यालयाकडे त्याची नोंदणी करण्यात आली. संबंधित डिझाईनची मौलिकता, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि कायदेशीर निकषांची सखोल तपासणी केल्यानंतर भारतीय पेटंट कार्यालयाने “Automated Economic Trend Analysis Device” डिझाईन पेटंट मंजूर केले.डिझाईन पेटंट मिळणे म्हणजे संबंधित डिझाईनच्या मूळ स्वरूपाचे संरक्षण करण्याचा विशेष कायदेशीर अधिकार प्राप्त होणे होय. त्यामुळे या डिझाईनचा अनधिकृत वापर, नक्कल किंवा व्यावसायिक गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले आहे. संशोधक आणि डिझायनर्ससाठी ही मान्यता अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.
या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा.डॉ.परमेश्वर गडकर म्हणाले, "नाविन्यपूर्ण कल्पनेवर विश्वास ठेवून सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. भारतीय पेटंट कार्यालयाकडून माझ्या डिझाईनला अधिकृत मान्यता मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. या यशामुळे भविष्यात अधिक संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली आहे."
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि मौजे राजेवाडी येथील गावकरी तथा प्रतिष्ठित नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर-दऱ्यांत वसलेल्या राजेवाडी गावचे भूमिपुत्र प्रा. डॉ. परमेश्वर गडकर यांनी यापूर्वीही शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील प्रत्येक यश ही राजेवाडी गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून, त्यांनी विकसित केलेल्या "ऑटोमेटेड इकॉनॉमिक ट्रेंड ॲनालिसिस डिव्हाईस" या डिझाईनला भारत सरकारकडून मिळालेले राष्ट्रीय डिझाईन पेटंट हे संपूर्ण गावासाठी गौरवाचा क्षण असल्याची भावना राजेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातूनही संशोधन आणि नावीन्याच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करता येते, याचे प्रा. डॉ. परमेश्वर गडकर हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवरही संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणारी ही प्रेरणादायी कामगिरी असल्याची भावना व्यक्त होत आहे. नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने परमेश्वर गडकर यांचे हे यश महत्त्वपूर्ण मानले जात असून, ग्रामीण भागातील तरुण संशोधकांसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा