३१ जुलै रोजी पुन्हा घेणार आढावा.....
परळी वैद्यनाथ मतदार संघातील मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) नोंदणी ३१ जुलै पर्यंत पूर्ण करा - धनंजय मुंडे
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने शासनाने मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान २००२ सालानंतर तब्बल २४ वर्षांनी राबवले असून यामध्ये प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव यादीत समाविष्ट करणे तसेच अपात्र नावे वगळण्याच्या दृष्टीने कारवाई करणे गरजेचे असते; यासाठी शासनाने दहा दिवसांचा वेळ वाढवून दिला असला तरीही ३१ जुलै पर्यंतच परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील मतदार पुनरीक्षण पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सूचना माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील बूथ लेव्हल एजंटांच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
आ. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली परळी वैद्यनाथ मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ लेव्हल एजंट (BLA) यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. परळी वैद्यनाथ शहर व ग्रामीण भाग अशा दोन टप्प्यात ही बैठक पार पडली. यावेळी मतदार पुनरीक्षणाचे काम सर्वाधिक टक्केवारी पूर्ण केलेल्या BLA यांचे प्रशासनासह धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले. परळी तालुक्यातील ३३,६०० व अंबाजोगाई तालुक्यातील ५००० मतदारांच्या विशेष पुनरीक्षणाची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या BLO यांच्या बाबतीत काही गावांमध्ये तक्रारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले असता, प्रशासनाने संबंधित BLO यांच्या बाबतीत आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यांना योग्य ताकीद द्यावी, अन्यथा कारवाई करावी, अशाही सक्त सूचना श्री. मुंडे यांनी दिल्या.
दरम्यान पुनरीक्षणाचे काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना ३१ जुलै रोजी पुन्हा सर्व BLA व पदाधिकारी यांची संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत पुन्हा बैठक घेऊन अंतिम आढावा घेणार असल्याचेही श्री. मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर व तहसीलदार विलास तरंगे यांनी गाव - प्रभागनिहाय आकडेवारी व अन्य माहिती सादर केली तसेच बूथ लेव्हल एजंट यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत माहिती दिली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, युवक नेते अजय मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, प्रा. विनोद जगतकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाडी - फ्रंटल सेलचे पदाधिकारी तसेच शहर व ग्रामीण मधील सर्व बूथ लेव्हल एजंट म्हणून कार्यरत सहकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा