गुजरातमधील पुरात अडकलेल्या ३५  पर्यटकामध्ये परळीतील दोघांचा समावेश; सुखरूप सुटका  


आ. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या तत्परतेने कुटुंबियांचा झाला संपर्क

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

      गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात नदीला आलेल्या अचानक पुरामुळे महाराष्ट्रातील सुमारे ३५ पर्यटक अडकल्याची घटना घडली. मात्र, गुजरात प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टरद्वारे बचाव मोहीम राबवत सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. या पर्यटकांमध्ये परळी वैजनाथ येथील रुपेश झंवर व त्यांची पत्नी जान्हवी झंवर या दाम्पत्याचाही समावेश होता. या पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या या दाम्पत्यांचा संपर्क तुटला होता.त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंताग्रस्त होते.मात्र याबाबत आ.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने तातडीने संबंधित गुजरात प्रशासनाशी संपर्क केला.संबधित छावणी व त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत झंवर दाम्पत्यांचा संपर्क करून दिला.

     खासगी ट्रॅव्हल बसने  प्रवास करत असतांना वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीला आलेल्या पुरामुळे बसचा मार्ग बंद झाला आणि पर्यटक अडकून पडले.  घटनेची माहिती मिळताच गुजरात प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक यंत्रणा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य राबविण्यात आले. एक-एक करून सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सर्व पर्यटक सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

          या घटनेमुळे महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबीयांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः परळी वैजनाथ येथील झंवर दाम्पत्याशी संपर्क तुटल्याने त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली होती. याबाबत माहिती मिळताच परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने तातडीने पुढाकार घेत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला आणि झंवर दाम्पत्याचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करून दिला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. अडचणीच्या प्रसंगी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने केलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...