लाल बावटा घर कामगार युनियनच्या वतीने कार्यक्रम.....
घरेलू कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव व अर्थिक मदत प्रदान
प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षणाची तळमळ व गुणवत्ता प्रेरणास्पद – नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
लाल बावटा घर कामगार युनियनच्या वतीने परळी शहरातील नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच युनियनच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला ₹1,000 ची आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.
परळीतील जाजूवाडी जवळील सिटू कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितलेकी, घरेलू कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. त्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणात यश मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रा. बी. जी. खाडे यांनी युनियनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत घरेलू कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमास युनियनच्या उपाध्यक्षा सुनीता ताटे, पद्मिनी रणदिवे, यमुना पाथरकर, मीरा ताटे, कुशावर्ता घोलप, अश्विनी कसबे, कुशावर्ता गांगर्डे, शिल्पा फुलचंद कसबे, मीनाक्षी बनसोडे, संगीता बनसोडे तसेच घरेलू कामगार, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जालिंदर गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा