आपल्या गुरूंना अभिमान वाटेल असे कार्य करावे.....
माझे बाबाच माझे गुरु; त्यांच्या संस्कारांतूनच लोकसेवेसाठी समर्पित जीवनाचा संकल्प – पंकजा मुंडे
गुरुपौर्णिमेनिमित्त पंकजाताई मुंडे यांचे लोकनेत्याला मनोभावे नमन!
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना शुभेच्छा देत गुरूंच्या ऋणाची जाणीव ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असून जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. माझे बाबा हेच माझे गुरु असुन त्यांच्या संस्कारांतूनच लोकसेवेसाठी समर्पित जीवनाचा संकल्प असल्याची दृढ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
गुरुपौर्णिमेनिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आपले पिता - नेता आणि गुरु लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना मनोभावे नमन केले. याप्रसंगी सर्वांना शुभेच्छा देत गुरूंच्या ऋणाची महती सांगताना त्यांनी सर्वांना महत्त्वपूर्ण संदेश दिला. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आपल्याला जीवनात उभे राहायला शिकवणारे, घडवणारे सर्वच गुरु हे देवतुल्य आहेत. आई-वडील हे देखील आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत. माझ्या आयुष्यातील गुरूस्थान माझे वडील, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे आहे. त्यांनी मला आयुष्यभर खूप काही शिकवले. आजही त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला प्रेरणा आणि शिकवण मिळते. त्यामुळे त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. याच भावनेतून आपण अधिक मेहनत करून, अधिक लोकसेवा करत लोक कल्याणासाठी समर्पित जीवन जगण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने एक चांगला संकल्प करावा आणि आपल्या गुरूंना अभिमान वाटेल असे कार्य करून त्यांच्या संस्कारांचे ऋण फेडावे असे आवाहनही त्यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा