एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचा आनंद...
जिजामाता गार्डन हेल्थ क्लबची गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी
ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी घेतला एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचा आनंद
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या जिजामाता गार्डन हेल्थ क्लबतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक स्थळांना भेट देणारी एकदिवसीय आध्यात्मिक सहल उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. या सहलीत ज्येष्ठ नागरिकांनी देवदर्शनासह संतांच्या समाधीस्थळांना भेट देत गुरुपौर्णिमेचा दिवस भक्तिभावाने साजरा केला.
क्लबचे अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा यांच्या प्रेरणेतून तसेच प्रतिष्ठित व्यापारी व क्लबचे दानशूर सदस्य बंडूसेठ गरूड यांच्या पुढाकाराने या सहलीचे आयोजन करण्यात आले. सहलीची सुरुवात श्री गरूड यांच्या "श्रद्धा वस्त्र भांडार" येथून झाली. गरूड परिवारातर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे गरमागरम कॉफीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर बालाजीराव डांगे यांच्या मिनी बसमधून सहलीस प्रारंभ झाला.
सर्वप्रथम श्रीक्षेत्र अंबाजोगाई येथे जाऊन श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेऊन श्री महादेव महाराज (तात्या महाराज) यांचे आशीर्वाद घेत महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.महादेवराव तात्या महाराज यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. पुढे श्रीक्षेत्र निनगूर (नेकनूर) येथील श्री कालिंका देवी मंदिर तसेच श्रीक्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन सहल भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
परतीच्या प्रवासात नांदूरघाट येथील आदित्य ढाकणे यांच्या रेणुका रेस्टॉरंटमध्ये क्लबचे सदस्य बालाजीसेठ चौलवार यांच्या वतीने सर्वांना स्पेशल कॉफी देण्यात आली. तसेच अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा यांच्या वतीने बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण प्रवासात नागनाथ पारसेवार यांनी हल्दीराम चिवड्याचे वितरण केले.संपूर्ण प्रवासात अभंग, भक्तिगीते आणि प्रवचनांचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांनी आध्यात्मिक वातावरणाचा आनंद लुटला.
या सहलीत अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा, ज्येष्ठ मार्गदर्शक विकासराव डुबे, बंडूसेठ गरूड, बाबुराव ताटीपाममल, योगगुरू नागनाथराव पारसेवार, निवृत्त पोलीस अधिकारी बलभीमराव रेपे, सुधाकरराव अंबेकर, गुलाबराव डोंगरे, श्रीधरराव बदाले, अनिलराव उदगीरकर, बालाजीराव चौलवार, दिलीपराव कासार, विश्वनाथराव शिंदे, चंद्रकांतराव पाथरकर, रुकिबे अप्पासाहेब,समुपदेशक गणपतअप्पा सौंदळे तसेच वाहनचालक बालाजीराव डांगे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या आध्यात्मिक सहलीमुळे उपस्थितांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा