धडक कारवाई : परळीत अवैध गोमांस विक्री उघड ;संभाजीनगर पोलिसांनी टाकला छापा
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहरातील उड्डाण पुलाजवळील मच्छी मार्केट परिसरात अवैधरित्या गोमांस विक्री उघड झाली असून संभाजीनगर पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाविरुध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजता उड्डाण पुलाच्या उत्तर बाजूस असलेल्या मच्छी मार्केट परिसरात आरोपी हा विनापरवाना गोमांस विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली.या कारवाईत २५ किलो गोमांस (किंमत ७,५०० रुपये), विक्रीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी तराजू व वजनमापे,लोखंडी सुरा आदी साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पोशेट्टी पुजरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सईद जमील कुरेशी (वय २४, रा. आझादनगर, परळी वैजनाथ, जि. बीड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(ब) व ९(ए) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घोडके करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा