सर्व आरोग्यविषयक उपक्रम गावागावात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन...

'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाला गती; परळीत तालुकास्तरीय कृती दल समितीची उत्साहात  बैठक 

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत जुलै २०२६ महिन्यासाठी नियोजित आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक गुरुवार, दि. २३ जुलै रोजी पंचायत समिती, परळी वैजनाथ येथे उत्साहात संपन्न झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले होते, तर सहअध्यक्ष म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले. बैठकीस तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, तालुका विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच पत्रकार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम जून २०२६ महिन्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य संपन्न गाव समित्यांच्या बैठका, शाळा व अंगणवाडीतील स्वच्छता मोहीम, योग शिक्षण तसेच हिवताप प्रतिरोध महिन्यांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्याविषयी समाधान व्यक्त करण्यात आले.

       जुलै महिन्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुका स्तरावरील बैठकीनंतर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीच्या बैठका तातडीने घेण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी तज्ज्ञांच्या उपस्थितीत विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय समाजात लिंग आधारित हिंसाचार रोखण्यासाठी जनजागृती मोहीम, सामुदायिक बैठका आणि संवाद कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जुलै महिना 'डेंग्यू प्रतिरोध महिना' म्हणून पाळला जात असल्याने कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी गावोगावी व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य आजार टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, स्वच्छतेचे महत्त्व आणि सुरक्षित पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच घरगुती घनकचऱ्याचे वर्गीकरण व योग्य संकलन यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला.जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पात्र जोडप्यांसाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करून कुटुंब नियोजनाबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीच्या  जुलै महिन्यातील सर्व आरोग्यविषयक उपक्रम गावागावात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्यदायी, स्वच्छ आणि रोगमुक्त गावांच्या निर्मितीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...