परळीतील अनेक भागात रात्रभर लाईट जाण्याचे महत्त्वाचे कारण आले पुढे
वीज वितरणाला आकाशीय विजेचा फटका: १३२ के.व्ही. सबस्टेशनवरच आकाशातून पडली वीज!
परळीत अनेक तास वीजपुरवठा खंडित; 132 केव्ही सबस्टेशनमधील चार रिले जळाले
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहर व परिसरात तासन्तास वीजपुरवठा खंडित होण्यामागचे नेमके कारण समोर आले असून, थर्मलजवळील 132 केव्ही सबस्टेशनवर शुक्रवारी सायंकाळी आकाशीय वीज कोसळल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला. या घटनेत 132 केव्ही यंत्रणेतील चार महत्त्वाचे रिले जळून निकामी झाल्याने वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली.
132 केव्ही सबस्टेशनमधील रिले हे ब्रेकर कंट्रोलर म्हणून कार्य करतात. आकाशीय विजेच्या तीव्र झटक्यामुळे हे चारही रिले जळाल्याने संबंधित फीडरमधील वीजपुरवठा तातडीने बंद पडला. परिणामी थर्मल 132 केव्ही सबस्टेशनवरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील वीज वितरण पूर्णपणे कोलमडले होते..घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली. सुमारे चार ते पाच तास अखंड परिश्रम घेऊन जळालेल्या रिलेमुळे निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला.पांगरी व दाउतपुर येथील 132 केव्ही सबस्टेशनच्या तांत्रिक दुरुस्याही तातडीने करण्यात आल्या. या फीडरमधील वीज वितरण रात्री सुमारे 10 वाजेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. थर्मल 132 केव्ही सबस्टेशनसह काळरात्री मंदिर परिसरातील वीज यंत्रणेतही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही भागात वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिक वेळ लागला. रात्रभर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून दुरुस्तीचे काम करत होते.
हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता ए. बी. खंडारे यांच्यासह संतोष कांदे, उत्तम फड, मुस्ताक, वैभव मुंडे, पी. एम. मुंडे, विकी मुंडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत वीज वितरण पूर्ववत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.या कार्यवाहीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेला वीजपुरवठा रात्रीपर्यंत सुरळीत करण्यात यश आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा