भाजप शहराध्यक्षा सौ. उमाताई चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांनी दिली माहिती...
ना. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत आठवडाभर सेवाभावी उपक्रमांची रेलचेल
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकप्रिय लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, परळी शहराच्या वतीने दि. २२ ते २८ जुलै या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजहिताला प्राधान्य देत नागरिकांसाठी उपयुक्त सेवा उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार असून, या माध्यमातून वाढदिवस सेवाभावी पद्धतीने साजरा केला जाणार आहे.भाजप शहराध्यक्षा सौ. उमाताई चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांनी नागरिकांना या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दि. २२ जुलै रोजी जिजामाता उद्यान येथे चित्रकला स्पर्धेने होणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवीसाठी रंगभरण स्पर्धा, तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण, जलसंवर्धन, 'जल है तो कल है', स्मरणचित्र व पशुसंवर्धन या विषयांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे. दि. २३ जुलै रोजी श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून, दि. २४ जुलै रोजी शिवाजीनगर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दि. २५ जुलै रोजी मारोती मंदिर, पद्मावती गल्ली येथे नेत्रतपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वैद्यनाथ प्रतिष्ठान येथे सर्वरोग निदान शिबिर तसेच खिचडी-फराळ वाटप असे विविध आरोग्य व सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दि. २६ जुलै रोजी ना. पंकजाताई मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री वैद्यनाथ मंदिरात अभिषेक, बुद्धवंदना, दर्ग्यात चादर अर्पण, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण व वैद्यनाथ मंदिरातील भाविकांना फळवाटप, श्रद्धानंद गुरुकुल येथे होमहवन व भोजन, वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण तसेच अन्नपूर्णा मातेची महाआरती व प्रसाद वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.दि. २७ जुलै रोजी वैद्यनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, एसटी स्मार्टकार्ड व ज्येष्ठ नागरिकांना वॉकर वितरण, वैद्यनाथ मंदिर परिसर व भाजी बाजारात छत्री वाटप तसेच सरस्वती विद्यालयात शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.या सेवा सप्ताहाची सांगता दि. २८ जुलै रोजी दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेने होणार आहे.
या सर्व समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नागरिकांनी तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्या व मोर्चांचे कार्यकर्ते, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप परळी शहराध्यक्षा सौ. उमाताई चंद्रकांतअप्पा समशेट्टे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा