भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
वैद्यनाथ नगरीत रुक्मिणी मातेच्या माहेरच्या दिंडीचे जल्लोषात आगमन!
मेणा, पालखी आणि विठ्ठलनामाच्या गजराने परळी दुमदुमली; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
परळी |प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर येथून निघालेली रुक्मिणी मातेच्या माहेरची पायी दिंडी वैद्यनाथ नगरी परळीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. रुक्मिणी मातेचा मेणा, पालखी आणि विठुरायाच्या अखंड जयघोषाने परळीचे वातावरण अक्षरशः विठ्ठलमय झाले.
"ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आणि "रुक्मिणी माता की जय"च्या घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भक्तिभावाने नाचत-गात पुढे सरकत होते. दिंडीचे आगमन होताच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
रुक्मिणी मातेचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर येथून निघणाऱ्या या दिंडीला वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. यामुळे दिंडीच्या स्वागतासाठी परळीतील विविध धार्मिक संस्था, वारकरी मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांची उधळण, आरती आणि जयघोषात दिंडीचे स्वागत करण्यात आले.
वैद्यनाथ नगरीतील मुक्कामादरम्यान भाविकांना रुक्मिणी मातेच्या मेण्याचे आणि पालखीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. यावेळी अनेकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणात सहभागी होत भक्तीचा अनोखा उत्सव अनुभवला.
आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राज्यभरातील वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. अशातच रुक्मिणी मातेच्या माहेरच्या दिंडीच्या आगमनाने परळीतील वारी सोहळ्याला वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली असून वैद्यनाथ नगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा