गॅस एजन्सीच्या बाबतीत परळीकरांच्या वाढत्या तक्रारी...
ऑनलाईन पैसे भरूनही घरपोच गॅस न दिल्याची तक्रार; गॅस वितरकावर कारवाईची मागणी
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्युटर (नाथ रोड) यांच्याकडून ऑनलाईन पैसे भरूनही घरपोच गॅस सिलिंडर न दिल्याचा आरोप करत ग्राहकाने तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित गॅस वितरकावर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
परळी वैजनाथ येथील रहिवासी तथा एचपी गॅसचे ग्राहक सचिन भांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी १४ जुलै २०२६ रोजी गॅस सिलिंडरचे ऑनलाईन बुकिंग करून संपूर्ण रक्कम भरली होती. कंपनीच्या नियमानुसार या रकमेत घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा शुल्काचाही समावेश असतानाही, संबंधित गॅस एजन्सीकडून सिलिंडर घरपोच देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ग्राहकाकडून पूर्ण पैसे स्वीकारूनही सेवा न देणे हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील 'सेवेतील त्रुटी (Deficiency in Service)' तसेच 'अनुचित व्यापारी प्रथा (Unfair Trade Practice)' या प्रकारात मोडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा आणि द्रवीकृत पेट्रोलियम गॅस नियमन आदेशाचेही उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे ग्राहकांची मानसिक व आर्थिक गैरसोय होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित वैद्यनाथ गॅस डिस्ट्रीब्युटरवर कठोर कारवाई करावी आणि स्वतःला तातडीने घरपोच गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सचिन भांडे यांनी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा