परळीत प्रथमच पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱ्याचे आगमन....!!!
नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि सेवा यासाठीच पोलीस २४ तास कार्यरत - पोलीस महासंचालक सदानंद दाते
परळीला पोलीस उपाधीक्षक पद, आवश्यक मनुष्यबळ व संभाजीनगर ठाण्याला इमारत आदी महत्वपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
नागरिक हाच केंद्रबिंदू असून, जनतेला सुरक्षित, विश्वासार्ह आणि तत्पर सेवा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल कटिबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांचा विश्वास संपादन करणे हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केले.त्याचबरोबर परळीला पोलीस उपाधीक्षक पद, आवश्यक मनुष्यबळ व संभाजीनगर ठाण्याला इमारत आदी महत्वपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक पोलीस महासंचालकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज (दि.७)परळी वैजनाथ पोलीस ठाण्याला भेट देऊन आढावा घेतला. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. आज सकाळी बीड येथून ते परळी वैजनाथ शहरात दाखल झाले. परळी येथे शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाण्यात पाहणी करून त्यांनी प्रशासकीय आढावा घेतला. त्याचबरोबर नागरिकांच्या शिष्टमंडळांना त्यांनी भेट देऊन निवेदनांचाही स्वीकार केला. यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे आदी उपस्थित होते.
प्रभू वैद्यनाथ मंदिरात पूजा व दर्शन
-------------------
बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात दाखल होत त्यांनी प्रभु वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. मंदिर व परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचनाही त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला केल्या. वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने सचिव राजेश देशमुख यांनी त्यांचे वैद्यनाथाची प्रतिमा व प्रासादिक उपरणे देऊन सत्कार केला. यावेळी विश्वस्त नंदकिशोर जाजू, विजयकुमार मेनकुदळे, रघुवीर देशमुख, आदी उपस्थित होते.
धनंजय मुंडेंच्या वतीने पोलिस महासंचालकांना निवेदन
----------------
परळी वैद्यनाथ शहरातील संभाजीनगर पोलिस ठाणे अत्यंत अपुऱ्या जागेत असून, ठाण्याची हद्द, लोकसंख्या व वाढता ताण लक्षात घेत या ठाण्यास स्वतंत्र नवीन इमारत उपलब्ध करून देण्यात यावी, घाटनांदूर येथे नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्यात यावे, परळी शहर, संभाजीनगर, परळी ग्रामीण, सिरसाळा, अंबाजोगाई ग्रामीण या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यात यावीत यांसह परळी मतदारसंघातील पोलीस दलाच्या सक्षमीकरण व प्रशासकीय बाबींच्या संदर्भात माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या वतीने आज राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना लेखी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हे निवेदन सादर केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, प्रा. मधुकर आघाव, माऊली मुंडे, शहराध्यक्ष अय्युब पठाण, प्रा. डॉ. विनोद जगतकर, माणिक फड, अनंत इंगळे, भागवत गित्ते यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा