चुकीची माहिती व निराधार बातम्या असल्याचे स्पष्टीकरण....
बीड जिल्हा कारागृहाबाबत प्रसारित वृत्त निराधार; कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण
बीड (प्रतिनिधी):
बीड जिल्हा कारागृहासंदर्भात ४ आणि ५ ऑगस्ट रोजी विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करत कारागृह प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. कारागृहातील कैद्यांना नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याच्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रभारी अधीक्षक, बीड जिल्हा कारागृह वर्ग-२ यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, कारागृहातील कोणत्याही बंदीवानास अनधिकृत अथवा नियमबाह्य सुविधा दिल्या जात नाहीत. सर्व सुविधा कारागृह नियमावलीनुसारच उपलब्ध करून दिल्या जातात.बंदीवानांना आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिटे दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी आहे. मात्र, फोनद्वारे बाहेरील व्यक्तीने कॉन्फरन्स कॉल किंवा कॉल रेकॉर्डिंग केल्यास त्यावर कारागृह प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, याबाबत कारागृह मुख्यालयालाही कळविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच, बंदीवानांना नियमाप्रमाणे आठवड्यातून दोन वेळा प्रत्येकी वीस मिनिटांची व्हिडिओ कॉल सुविधा तसेच नातेवाईक आणि वकिलांशी भेटण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
कारागृहात बाहेरून जेवण किंवा खाद्यपदार्थ नियमबाह्य पद्धतीने दिले जात नसल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, कारागृहातील उपहारगृह सुविधेअंतर्गत बंदीवानांना नियमानुसार महिन्याला २० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी असून, त्यामध्ये खाद्यपदार्थांचाही समावेश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.यापूर्वीही अशा प्रकारच्या वृत्तांची वरिष्ठ कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आल्याचा उल्लेख करत, प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचा पुनरुच्चार कारागृह प्रशासनाने केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा