नगरसेविका अश्विनी केंद्रे व युवा नेते राहुल केंद्रे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार ...
ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिरासतील पात्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगरला रवाना
नगरसेविका अश्विनी केंद्रे व युवा नेते राहुल केंद्रे यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा लोकनेत्या ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. अश्विनी राहुल केंद्रे व युवा नेते राहुल रामचरण केंद्रे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना आज अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.
आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर आणि अरिहंत जैन सेवाभावी संस्था, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर, पद्मावती गल्ली येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आधुनिक संगणकीय यंत्रणेद्वारे नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मोतीबिंदू असलेल्या गरजू रुग्णांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर अल्पदरात शस्त्रक्रिया करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ज्येष्ठ नागरिक तसेच उपचारांपासून वंचित राहिलेल्या अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे नागरिकांनी कौतुक केले.
यावेळी युवा नेते राहुल रामचरण केंद्रे म्हणाले, "जनतेला दिलेला एक-एक शब्द पूर्ण करणार, एवढे मी माझ्या सर्व मायबाप जनतेला आश्वस्त करतो. समाजहिताचे आणि जनकल्याणाचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविले जातील." ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेविका सौ. अश्विनी राहुल केंद्रे, युवा नेते राहुल रामचरण केंद्रे, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच अरिहंत जैन सेवाभावी संस्था आणि आनंदऋषीजी नेत्रालयाच्या वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा