Motivational video: पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रेरक कार्यशैली
'देश हाच परिवार'... पंतप्रधान मोदींच्या देशाला समर्पित कार्यशैलीचा जवळून घेतलेला अनुभव
पंकजा मुंडेंचा भावनिक व्हिडिओ चर्चेत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणे नव्हे, तर स्वतःला एका मोठ्या ध्येयासाठी पूर्णपणे वाहून घेणे," अशी भावना व्यक्त करत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती विषयीचा एक अनुभव मांडला आहे. दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रत्यक्ष आलेला हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे शेअर केला असून, त्यात मोदी यांची कामावरील निष्ठा, राष्ट्रप्रथमचा दृष्टिकोन आणि अविरत कार्यक्षमतेचा उल्लेख केला आहे.
पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी त्या दोन-तीन दिवस दिल्लीत होत्या. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा अधिकृत दौरा पूर्ण करून थेट बैठकीला दाखल झाले. प्रवासाचा थकवा बाजूला सारत त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर त्यांनी सखोल चर्चा केली.
विशेष म्हणजे, ही बैठक तब्बल साडेआठ तास चालली. या कालावधीत केवळ दोन वेळा चहा आणि एकदा कॉफीसाठी अल्प विश्रांती घेण्यात आली. उर्वरित संपूर्ण वेळ पंतप्रधान प्रत्येक विषयात बारकाईने लक्ष घालत चर्चा करत होते. एका बैठकीकडे त्यांनी दाखविलेली एकाग्रता आणि सातत्य पाहून आपण प्रभावित झाल्याचे पंकजाताई मुंडे यांनी नमूद केले.
या अनुभवातून त्यांना सर्वाधिक जाणवलेली गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी यांची राष्ट्राशी असलेली भावनिक बांधिलकी. ज्यांना स्वतःचा परिवार नाही, त्यांनी या देशालाच आपला परिवार मानले आहे. भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि जगातील अग्रगण्य राष्ट्र व्हावे, यासाठी ते प्रत्येक क्षण समर्पित करत आहेत. बैठकीच्या दिवशी पंतप्रधान मोदी उपवासावर असल्याचा उल्लेख करत पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, उपवास असूनही त्यांच्या कामातील ऊर्जा, एकाग्रता आणि उत्साह किंचितही कमी झाला नव्हता. दीर्घ बैठकीदरम्यान त्यांनी प्रत्येक विषयात सक्रिय सहभाग घेतला. शारीरिक मर्यादा ओलांडून ध्येयासाठी सातत्याने काम करण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या अनुभवाने स्वतःच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या परीने 'खारीचा वाटा' उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उत्तम प्रशासन, सकारात्मक विचार आणि समाजहिताची भावना जोपासली तरच राष्ट्र अधिक सक्षम होईल. तसेच, नकारात्मकते ऐवजी क्षमा, सकारात्मकता आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची मानसिकता समाजात रुजली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक नागरिक हा देशाच्या भविष्याचा भागीदार असून, भारताला अधिक समर्थ आणि विकसित राष्ट्र बनविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असा संदेश त्यांनी या व्हिडिओतून दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा