वैद्यनाथ कॉलेजच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..

तपोवनचे सुपुत्र शिवशंकर (अण्णा) कराड यांच्या निधनाने मोठी हानी



नामांकित कुस्तीगीर, शेतकरी व समाजसेवक हरपल्याने बीड जिल्ह्यात शोककळा

परळी वैजनाथ / तपोवन, प्रतिनिधी : तपोवन येथील नामांकित कुस्तीगीर, कर्तव्यनिष्ठ शेतकरी, समाजसेवक तथा क्रीडाप्रेमी शिवशंकर (अण्णा) कराड यांचे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाल्याने तपोवन परिसरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, कुस्तीप्रेमी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

शिवशंकर अण्णा कराड हे तपोवन व नागपिंपरी येथील मातीशी घट्ट नाते जपणारे एक प्रसिद्ध कुस्तीगीर होते. ग्रामीण भागातील कुस्ती परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्यांनी आपल्या कुस्ती कौशल्याच्या बळावर तपोवन, बीड जिल्हा आणि मराठवाड्याचे नाव उज्ज्वल केले.ते बीड जिल्हा कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.तसेच नागपिंपरी या गावचे माजी सरपंच होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट असे कामे केली आहेत. कुस्ती या पारंपरिक खेळाच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. ग्रामीण भागात कुठेही कुस्ती स्पर्धा किंवा दंगल आयोजित करण्यात आली, तर ते आवर्जून उपस्थित राहत असत. खेळ आणि खेळाडूंप्रती असलेल्या त्यांच्या निस्सीम प्रेमामुळे ते कुस्ती क्षेत्रात सर्वांचे आप्तेष्ट बनले होते.

कराड कुटुंबाची क्रीडा क्षेत्रातील समृद्ध परंपरा

कराड कुटुंबाची क्रीडा क्षेत्रात एक समृद्ध परंपरा आहे. वैद्यनाथ महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित डॉ. पी. एल. कराड यांचेही या क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. गावातील आखाडा आणि महाविद्यालयीन क्रीडा क्षेत्र या दोन्ही माध्यमांतून कराड कुटुंबाने क्रीडा संस्कृती जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.शिवशंकर (अण्णा )कराड यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि हसतमुख होता. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असे. नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.ते तरुण कुस्तीपटूंना मार्गदर्शन करीत असत. आपल्या अनुभवाच्या आधारे नवोदित खेळाडूंना कुस्तीचे तंत्र आणि शिस्तीचे धडे देत असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली.

आदर्श पिता आणि कर्तव्यनिष्ठ शेतकरी

शिवशंकर अण्णा कराड हे केवळ एक उत्कृष्ट कुस्तीगीर नव्हते, तर ते आदर्श पिता, कष्टाळू शेतकरी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये शिक्षण, शेती, सेवा आणि संस्कार यांचा सुंदर समन्वय साधला.क्रीडा क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे लहान बंधु प्राचार्य डॉ. चंद्रकांत कराड व त्यांचे पुतणे प्रा.डॉ. पी. एल.कराड उल्लेखनीय कार्य करत आहेत तसेच

त्यांचे पुत्र प्रा. रविकांत कराड हे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर डॉ. शशिकांत कराड हे नामांकित दंतचिकित्सक आहेत. कुटुंबातील सदस्य विविध क्षेत्रांत कार्यरत असून कराड कुटुंबाची सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील परंपरा पुढे नेत आहेत.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक नामांकित खेळाडू, कुस्तीप्रेमी आणि नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी उपस्थिती लावली. यावरून समाजात आणि क्रीडा क्षेत्रात त्यांना असलेला आदर आणि प्रेम स्पष्ट झाले.

वैद्यनाथ कॉलेजच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

शिवशंकर (अण्णा )कराड यांच्या निधनाबद्दल वैद्यनाथ कॉलेजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ते प्रेरणास्थान होते. 

त्यांच्या निधनामुळे कराड कुटुंबासह तपोवन, नागपिंपरी व बीड जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यातील क्रीडाप्रेमींची मोठी हानी झाली आहे.शिवशंकर (अण्णा ) कराड यांचे जीवन हे ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी होते. कुस्ती, शेती, समाजसेवा, शिस्त आणि माणुसकी या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर आदर्श जपला. त्यांच्या कार्याची आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची आठवण तपोवन व मराठवाड्यातील क्रीडाप्रेमींच्या मनात सदैव जिवंत राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व कराड परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी सर्व स्तरांतून प्रार्थना महाविद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डी राठोड, उपप्राचार्य डॉ. व्ही. गायकवाड प्राध्यापक डी के आंधळे प्रा. हरीश मुंडे,समन्वयक प्रा यु आर कांदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शिवशंकर (अण्णा) कराड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!