संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळीला राज्यस्तरावर गौरवास्पद प्रतिनिधित्व : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे मुंबईत शपथग्रहण
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ- गव्हर्नमेंट नियामक मंडळावर बिनविरोध निवड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
परळी वैजनाथ च्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट (ऑल- एलएसजी) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य नियामक मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील अंधेरी येथील संस्थेच्या मुख्यालयात शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा शपथग्रहण समारंभ पार पडला. या निवडीमुळे परळीला राज्यस्तरावर गौरवास्पद प्रतिनिधित्व मिळाले आहे. दरम्यान, या संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधून नियामक मंडळाच्या दोन जागांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवडणुकीसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्षा डॉ. अर्चनाताई अरुण अडसड यांची बिनविरोध निवड झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, नागरी प्रशासनातील क्षमता-वृद्धी, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संशोधन आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा प्रसार यासाठी ही संस्था कार्यरत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, शहरी नियोजन आणि सुशासन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांत स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्याची भूमिका संस्थेची आहे.
माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी तसेच परळी नगर परिषदेतील सर्व सदस्यांच्या मार्गदर्शन, सहकार्य व तमाम परळीकरांचे प्रेम आणि विश्वास याबद्दल सौ.धर्माधिकारी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या निवडीचे परळीकरांमधून स्वागत होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी
------------------
परळीचा सर्वांगीण विकास साधणे आणि नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणे ही आपली जबाबदारी आहे. राज्यस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू, अशी भावना शपथ ग्रहणानंतर नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा