परळी रेल्वे विकास समितीचे डीआरएमना निवेदन

दिवाळीसाठी पुणे-मुंबईहून परळीमार्गे नांदेडला विशेष रेल्वे गाड्या सोडा!

प्रवाशांची वाढती गर्दी आणि खासगी वाहतुकीच्या वाढीव दरांकडे लक्ष वेधत परळी रेल्वे विकास समितीचे डीआरएमना निवेदन

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

    दिवाळी सणासाठी पुणे आणि मुंबई येथून मराठवाड्यातील आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे व मुंबई येथून परळी वैजनाथमार्गे नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी परळी रेल्वे विकास समितीने केली आहे. दोन्ही मार्गांवर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी दोन विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या मंडल रेल्वे व्यवस्थापकांकडे (डीआरएम) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुणे आणि मुंबई येथे शिक्षण, नोकरी तसेच व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या परळी वैजनाथसह मराठवाड्यातील अनेक नागरिक दिवाळीनिमित्त गावी परततात. त्यामुळे सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. सध्या नियमित रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी असून, अनेक गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतही वाढ झाली आहे. परिणामी, प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खासगी प्रवासाचा आर्थिक भार

रेल्वे तिकिटांची उपलब्धता कमी झाल्याने प्रवाशांना खासगी बस आणि ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागत आहे. या परिस्थितीत खासगी वाहतूकदारांकडून वाढीव दर आकारले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गाला बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात प्रवाशांना परवडणाऱ्या दरात आणि सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. पुणे व मुंबई येथून परळीमार्गे नांदेडकडे जाणाऱ्या तसेच परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्या सुरू केल्यास प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

परळी रेल्वे विकास समितीचे मुख्य समन्वयक कैलास तांदळे यांच्यासह श्रीकांत पाथरकर, आत्मलिंग शेटे, सत्यनारायण दुबे, अनंत इंगळे, अॅड. अरुण पाठक आणि प्रा. शंकर कापसे यांनी ही मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन विशेष गाड्या सुरू कराव्यात, अन्यथा प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही समितीने निवेदनात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!