उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याससह वरिष्ठ नेत्यांकडून सांत्वन...
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मातृशोक; शिवकांताबाई गुट्टे यांचे निधन
राजकीय,सामाजिक क्षेत्रासह सर्व स्तरातून शोकसंवेदना
परळी वैजनाथ : प्रतिनिधी....
शिवसेनेच्या नेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे (वय ७५) यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी नंदनज (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने अंधारे-गुट्टे कुटुंबावर शोककळा पसरली असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी दूरध्वनीवरून शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दिवंगत शिवकांताबाई या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ज्येष्ठ व विश्वासू सहकारी दत्तराव गुट्टे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात धनराज, विशाल, रविराज, राम, ऋक्षराज ही पाच मुले, सुषमा अंधारे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत शिवकांताबाई या अतिशय मनमिळाऊ, कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने गुट्टे कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे. नंदनज ता. परळी वैजनाथ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारावेळी परळी आणि पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, परळीच्या नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुषमा अंधारे यांचं वरिष्ठ नेत्यांकडून सांत्वन...
--------------------
दरम्यान, या दुःखद प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, आमदार अर्जुन खोतकर, आमदार मिलिंद नार्वेकर , परळीच्या नगराध्यक्षा सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आदींनी सुषमा अंधारे व त्यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत सांत्वन केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा