कपिलधार यात्रेतील दिंड्यांसाठी पाणी आणि पोलीस बंदोबस्त द्या

शिवकुमार केदारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; महाराष्ट्र-कर्नाटकातून ७० हून अधिक दिंड्या येणार

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र कपिलधार येथे २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या कार्तिक पौर्णिमा यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या पायी दिंड्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, तसेच भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी वीरशैव विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवकुमार राजेश्वर केदारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागांतून ७० हून अधिक पायी दिंड्या कपिलधार येथे दाखल होतात. अनेक दिवसांचा प्रवास करून येणाऱ्या या दिंड्यांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह हजारो भाविक सहभागी असतात. त्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून कपिलधार येथे पोहोचेपर्यंत दिंड्यांच्या मार्गावर आवश्यकतेनुसार स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियोजनाची मागणी

पायी दिंड्यांचा प्रवास राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून होत असल्याने अपघातांचा धोका संभवतो. त्यामुळे प्रमुख चौक, धोकादायक वळणे आणि दिंडी मार्गांवर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा. संबंधित पोलीस ठाण्यांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणीही केदारी यांनी केली आहे.

दिंडीप्रमुखांशी समन्वय, मुक्कामाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, स्वतंत्र संपर्क अधिकारी आणि नियंत्रण कक्षाची नियुक्ती अशा नऊ प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याशिवाय महसूल, पोलीस, आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागांची संयुक्त बैठक घेऊन यात्रेचे पूर्वनियोजन करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने यात्रेपूर्वीच नियोजन करावे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून येणाऱ्या शिवभक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत. भाविकांची सेवा ही मानवतेचे कर्तव्य असून प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन शिवकुमार केदारी यांनी केले.

या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार धनंजय मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..