पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर  अधिकाऱ्यांशी चर्चा

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, शेतकऱ्यांना मदतीबरोबरच दुष्काळ निवारणासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश

*गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी गाव घेतले दत्तक ; पुढील महिन्यात गावास भेट देणार* 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सामुहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन द्या

जालना,दि. १६ ---

जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पीक पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश राज्याच्या  पर्यावरण व पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज दिले. गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी दत्तक घेत असल्याचे सांगून पुढील महिन्यात आपण या गावास  भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

   पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आज जालना दौऱ्यावर होत्या, जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जि प चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे आदी यावेळी उपस्थित होते. 

  यावेळी पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील ९५४ गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती असून, या गावातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. पीकविमा प्रक्रियेतही पारदर्शकता व अचूकता राखण्याच्या सूचना देत, शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत-जास्त लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावा असे निर्देश दिले.

*पिण्याचे पाणी, चाऱ्याचे नियोजन*

---------

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर जीपीएस प्रणालीने नियंत्रण ठेवावे, जलस्रोतांचे पुनर्भरण करावे तसेच नदी-नाल्यांचे खोलीकरण करावे, असे त्यांनी सांगितले. पाणी वापरात दहा टक्के कपातीच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळावा, असेही निर्देश त्यांनी दिले. 

जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा साक्षरता अभियान राबवून मुरघास, हायड्रोपोनिक्स व अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे. रोजगार हमी योजनेची कामे जलसंधारणाशी जोडून विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे आणि जलस्रोतांचे पुनर्जीवन यांना प्राधान्य द्यावे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

*शेतकऱ्यांना मदत, सामुहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन द्या*

--------

दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांवर मानसिक ताण येऊ नये यासाठी गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर समुपदेशन व संवाद उपक्रम राबवून त्यांचे मनोबल वाढवावे असे सांगत टंचाईच्या काळात सामुहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन द्या, पाणी पुरवठा योजनांची वसुली करताना मवाळ धोरण ठेवा असे त्या म्हणाल्या.

*सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी गांव दत्तक*

---------

‘गाव दत्तक अभियान’ अंतर्गत दुष्काळग्रस्त गावांना मदत देण्याच्या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. या अंतर्गत सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आपण अंतरवाली सराटी गाव दत्तक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहितेनंतर याठिकाणी आपण भेट देणार असल्याचे त्या म्हणाल्या. दुष्काळग्रस्तांना मदत करताना सीएसआर च्या बरोबरीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देखील पुढे राहील असे त्या म्हणाल्या.

*जलसंवर्धनाची कामे हाती घ्या*

--------

शेतकरी व ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत रोजगारनिर्मितीची कामे प्रभावीपणे राबवावीत. जलसंधारण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि विहिरींची दुरुस्ती यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा. यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल. पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट, बंधारे व नाला खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असून, भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

*टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा आढावा*

--------

यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी पीक पंचनामे, जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, रोजगार हमी योजना आणि शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!