कर्जमुक्त असल्याचे भासवून कारची विक्री; परळीत एकाची ११.५२ लाखांची फसवणूक
परळी वैजनाथ : प्रतिनिधी....
बँकेचे कर्ज असलेली ‘किया सेल्टॉस’ कार कर्जमुक्त असल्याचे भासवून विक्री केल्याप्रकरणी परळीतील एका जणाची ११ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कार्स २४ चा डीलर दीपक झंवर याच्याविरुद्ध २७ ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक झंवर याने कारवर कोणतेही कर्ज नसल्याचे भासवून परळीतील मुकेश काबरा यांना ती विकली. त्याच्या सांगण्यावरून काबरा यांनी कार्स २४ च्या खात्यावर ११ लाख ५२ हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्यांना कारचा ताबाही मिळाला. मात्र, कारच्या कागदपत्रांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित वाहनावर छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड अर्बन बँकेचे कर्ज असल्याचे समोर आले. त्यामुळे कार अद्याप काबरा यांच्या नावावर हस्तांतरित होऊ शकलेली नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुकेश काबरा यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार दीपक झंवर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा