आर्यवैश्य महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवात नऊ दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी!
तीन दशकांची परंपरा कायम; देवीची आकर्षक सजावट, भजन, जोगवा, गोंधळ आणि समूह नृत्याने उत्सवात रंगत
परळी : महिलांची एकजूट, परस्पर सहकार्य आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा जागर जपत परळीतील आर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने आर्यवैश्य मंगल कार्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त सलग नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, देवीच्या विविध रूपांतील आकर्षक सजावट आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्रोत्सवाला विशेष रंगत आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज एका विभागातील महिलांना देवीची विशेष सजावट करण्याची संधी दिली जाते. संबंधित विभागातील महिला एकत्र येऊन देवीला विविध रूपांत सजवतात. त्यानंतर सामूहिक आरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. भक्तिभावाने भारलेले वातावरण, देवीच्या जयघोषाने दुमदुमणारे मंगल कार्यालय आणि महिलांचा उत्साही सहभाग यामुळे उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे.
देवीची भजने, जोगवा, गोंधळ, समूह नृत्य यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे या नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यातील स्नेहभाव, आत्मीयता आणि सांघिक भावना वृद्धिंगत करण्याचे काम या उपक्रमांतून होत आहे. धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर संगम या उत्सवात पाहायला मिळत आहे.
आर्यवैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा मेघा सुनील डुबे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचे कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत. मंडळाने गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा जपली आहे. वर्षभर महिलांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबविले जातात. मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ, भागवत पारायण, श्रावण महिन्यात सामूहिक लिंगार्चन आणि मेरुप्रदक्षिणा असे धार्मिक उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
या कार्यक्रमांच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन करण्यासोबतच महिलांमधील एकोपा आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ केली जात आहे. तीन दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा नव्या उत्साहाने पुढे नेण्याचे काम मंडळातील महिला करीत आहेत.
या उपक्रमांत मंडळाच्या अध्यक्षा . मेघा सुनील डुबे, उपाध्यक्षा सविता रमेश देशटवार, सचिव . सुजाता सतीश गडम यांच्यासह पदाधिकारी . जयमाला विकासराव डुबे, . अर्चना मिलिंद रुद्रवार, अर्चना श्रीनिवार, उषा नितीन देवशेटवार,. सविता रायचूरकर, . नंदा पारसेवार, . जना पारसेवार, . ललिता रुद्रवार, . सुलभा रुद्रवार, . वैशाली राजेश चिद्रेवार, . सुरेखा चिद्रेवार, . प्रज्ञा चौलवार, गीतांजली रुद्रवार, शोभा झरकर, रत्नमाला पारसेवार, . नंदिनी पारसेवार, सविता राजेंद्र डुबे, . स्नेहा रेवणवार, पायल बेंजामिनवार आणि . मीना डुबे यांच्यासह मंडळातील अन्य महिला सक्रिय सहभाग घेत आहेत.
महिलांच्या एकजुटीतून धार्मिक परंपरेचे जतन आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, हेच आर्यवैश्य महिला मंडळाच्या तीन दशकांच्या वाटचालीचे वैशिष्ट्य ठरत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा