दोघांना अटक, ७१,४००/- रोकड हस्तगत
परळी वैजनाथ : रेडीमेड कपड्यांच्या दुकानातील चोरीत आंतरराज्य टोळी!
दोघांना अटक, ७१,४००/- रोकड हस्तगत
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.,..
परळी वैजनाथ येथील गांधी मार्केट परिसरातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ७१,४०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २:०० ते २:३० वाजण्याच्या सुमारास, परळी वैजनाथ येथील गांधी मार्केटमधील 'अजय कलेक्शन' या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून अंदाजे १,५०,०००/- रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दिनांक १४.१०.२०२६ रोजी पाटोदा येथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी या चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अकबर लुकमान खान (वय ३२ वर्षे, रा. जळगाव), परवेज मेहमूद सय्यद (वय २२ वर्षे, रा. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. तर मोईन बादशहा शेख (रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), अशपाक सबीर खान (रा. पाचोरा, जि. जळगाव) हे आरोपी फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ५०० रुपयांच्या १४२ नोटा आणि १०० रुपयांच्या ४ नोटा असा एकूण ७१,४००/- रुपयांचा रोकड मुद्देमाल जप्त केला आहे.ही यशस्वी कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या पथकाने केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजस्थान राज्यातील गुन्ह्यांशी टोळीचा संबंध
-------------------
या तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहे की, या आंतरराज्य टोळीचे राजस्थान राज्यातील अजमेर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांशी देखील संबंध आहेत. यामध्ये : पोलीस स्टेशन गंज, अजमेर — गु.र.नं. २१३/२०२६, पोलीस स्टेशन आदर्श नगर, अजमेर — गु.र.नं. २०६/२०२६ या गुन्ह्यांचा समावेश आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा