परळी नगर परिषदेत आधुनिक वाहनांची भर; सक्शन मशीन, आपत्ती व्यवस्थापनासाठी बोट आणि बुलेट दाखल!
नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत वाहनांचे लोकार्पण
परळी वैजनाथ : प्रतिनिधी....
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने परळी नगर परिषदेत नवीन वाहनांची भर पडली आहे. नगर परिषदेकडे सक्शन मशीन, आपत्ती व्यवस्थापनासाठी बोट तसेच बुलेट उपलब्ध झाली असून, या वाहनांचे लोकार्पण नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन तसेच विविध नागरी सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी सक्शन मशीन उपयुक्त ठरणार आहे. तर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थिती अथवा जलमय भागातील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाची बोट महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याशिवाय बुलेटमुळे आपत्कालीन कामकाज आणि क्षेत्रीय पातळीवरील हालचालींना मदत होणार आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नगर परिषदेकडे आवश्यक यंत्रसामग्री आणि साधनसामग्री उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. नव्याने दाखल झालेल्या या वाहनांमुळे स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्षा खैसर राजा खान पठाण, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, यांच्यासह सर्व सभापती, गटनेते, नगरसेवक आणि नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा