राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आंदोलनाचा इशारा....
सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉइन क्लबच्या नावाखाली अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; कठोर कारवाई करा – सतीश कुंडगिर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉइन क्लबच्या नावाखाली अवैध धंद्यांना ऊत आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ओबीसी तालुकाध्यक्ष सतीश कुंडगिर यांनी केला आहे. या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असुन संबंधित अवैध व्यवसायांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सतीश कुंडगिर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कॉइन क्लबच्या नावाखाली सिरसाळा परिसरात विविध अवैध व्यवहार सुरू आहेत. दिवसा क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कथितरीत्या वेश्याव्यवसाय, मटका तसेच अवैध गुटखा विक्रीसारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. विशेषतः संबंधित ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते, असेही सतीश कुंडगिर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष तपासणी करून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सतीश कुंडगिर यांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा