वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा...
वैद्यनाथ कॉलेजमध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये जीवनात रुजवावीत- डॉ. माधव रोडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज, परळी वैजनाथ येथे २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड होते, तर प्रमुख वक्ते म्हणून भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधव रोडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी. एल. कराड, उपप्राचार्य व कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डी. के. आंधळे, उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. टी. ए. गिते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. के. आंधळे यांनी केले. त्यांनी संविधान दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करून भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये संविधानाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व विशद केले.
प्रमुख वक्ते डॉ. माधव रोडे यांनी आपल्या विशेष व्याख्यानातून भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, संविधान सभेचे योगदान आणि संविधान निर्मितीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावर सविस्तर विवेचन केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये, लोकशाही मूल्ये तसेच सामाजिक न्यायाची संकल्पना यांचा त्यांनी ऊहापोह केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही संविधानाची मूलभूत मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाने आपल्या आचरणात आणली पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर भारतीय संविधान कसे आंगिकृत करावे या संदर्भात विविध उदाहरणे व दाखले डॉ. माधव रोडे यांनी दिले
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड यांनी भारतीय संविधान हे देशाच्या एकात्मतेचे, लोकशाहीचे आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी संविधानाचा सखोल अभ्यास करून संविधानिक मूल्यांचा आदर करावा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या कार्यक्रमात 26/ 11 या दिवशी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. या दिवसाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. यासाठी यश सूर्यवंशी, अल्तामश शेख, उद्धव केंद्रे, कु. साक्षी जाधव व कु.लक्ष्मी कांबळे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रमोद गीत्ते व आभार प्रा.दिलीप गायकवाड यांनी मांनले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा