माजलगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.....
माजलगाव बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; चोरट्याला सात तासांत बेड्या!
माजलगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त
माजलगाव (प्रतिनिधी) : बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून पसार झालेल्या चोरट्याला माजलगाव शहर पोलिसांनी अवघ्या सात तासांत जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक महिला माजलगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत तिच्या गळ्यातील साडेचार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक बाबींचे विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी किरण लक्ष्मण जाधव (वय २३, रा. मंठा, ता. मंठा, जि. जालना) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेले सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यापासून अवघ्या सात तासांच्या आत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड, पोलीस हवालदार किशोर जाधव, पोलीस हवालदार पोहराम भंडाणे, पोलीस गणेश नागरे, पोलीस कर्मचारी महेश चव्हाण, महादेव बहिरवाळ व होमगार्ड विजय साळवे यांनी केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा