दुष्काळ, पाणीटंचाई, नदीजोड प्रकल्पासह मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासावर होणार मंथन…चेतन सौंदळे
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक २९ नोव्हेंबरला परळीत
दुष्काळ, पाणीटंचाई, नदीजोड प्रकल्पासह मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासावर होणार मंथन - चेतन सौंदळे
परळी-वैजनाथ : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता परळी-गंगाखेड रोडवरील वडगाव (दा.) येथील श्री. शंभू महादेव मंदिर, ‘मातीची माया’ कृषी पर्यटन केंद्र, नरवणे यांच्या शेतात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस केंद्रीय कार्यकारिणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, माजी आमदार श्री.डी.के. देशमुख,नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी,अखिल भारतीय किसान सभा राज्य सहसचिव श्री.अजय बुरांडे,माझी नगराध्यक्ष श्री.बाजीराव धर्माधिकारी, म.ज.वि.प.सचिव प्रा.अर्जुन जाधव, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आगवान,उपाध्यक्ष श्री.शिरीष देशमुख,बीड व परभणी जिल्ह्याचे सचिव प्रा. सुमंत गायकवाड व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बैठकीमध्ये परिषदेच्या मागील कामकाजाचा आढावा, संस्थेच्या जमा-खर्चास मान्यता, जिल्हा व महानगर शाखांचे कार्य अहवाल, संस्थेची संघटनात्मक पुनर्रचना व नवीन विश्वस्तांची नियुक्ती यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, भीषण पाणीटंचाई, नदीजोड प्रकल्प आणि पाण्याच्या शाश्वत नियोजनाबाबत सविस्तर विचारमंथन होणार आहे. मराठवाड्याच्या विकासातील प्रलंबित प्रश्न, सिंचन, शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य तसेच रेल्वे व रस्ते वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांबाबतही ठोस भूमिका व कृती आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने चर्चा व निर्णय होणार आहेत.
मराठवाड्याच्या विकासासाठी लोकाभिमुख भूमिका घेऊन विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे कार्य परिषद सातत्याने करीत आहे. या बैठकीच्या माध्यमातून विभागाच्या विकासासाठी संघटनात्मक पातळीवर पुढील दिशा निश्चित होणार आहे.
या बैठकीस केंद्रीय कार्यकारिणी सदस्यांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हा व महानगर शाखांचे अध्यक्ष, सचिव आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे परळी-वैजनाथ शाखेचे प्रमुख मार्गदर्शक जी. एस. सौंदळे, अध्यक्ष चेतन सौंदळे, डॉ. वसंतराव मुंडे,श्रीकांत पाथरकर,अनंत इंगळे तसेच शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा