सार्थक खडके यांच्यासह जखमींच्या प्रकृतीची केली विचारपूस...

खडके कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारांसाठी सहकार्याचे आश्वासन; कॅप्टन आशिष दामले यांची गेवराईत भेट

गेवराई : सुनीलराव खडके यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले कॅप्टन आशिष दामले यांनी गेवराई येथे खडके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या सार्थक सुनीलराव खडके आणि ओम गणेशराव खडके यांच्या प्रकृतीची तसेच सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती त्यांनी घेतली. सार्थक यांच्या उपचारांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

खडके यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत कॅप्टन दामले यांनी कुटुंबीयांना धीर देत, या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. संकटाच्या काळात खडके कुटुंबीयांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गेवराईचे भाजप नेते बाळराजे दादा पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दीपक रणनवरे, 'परळी संचार'चे संपादक अनंत कुलकर्णी यांच्यासह गेवराई व परळी येथील ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव आणि नागरिक उपस्थित होते.

परळीच्या सकल ब्रह्मवृंदाकडून हल्ल्याचा निषेध

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर परळी येथील सकल ब्रह्मवृंदाच्या वतीनेही खडके कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत या अमानुष मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या दुःखद प्रसंगी खडके कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही समाजबांधवांनी दिली.

संकटाच्या काळात दुःखात सहभागी होणे, पीडित कुटुंबाला धीर देणे आणि न्यायासाठी एकजुटीने उभे राहणे, हीच माणुसकीची खरी ओळख असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..