जलतरणानंतर योगासनातही आभाची सुवर्णभरारी; राज्यात प्रथम क्रमांक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाची नवनवी शिखरे सर करणाऱ्या बीड जिल्ह्याच्या आभा गणेश मुंडे हिने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे येथे पार पडलेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्य पॅरा योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये आभाने अस्थिव्यंग प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. या यशामुळे तिची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुण्यात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णयश
महाराष्ट्र पॅरा योगासन स्पोर्ट कमिटी आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, बाळ कल्याण संस्था व चिरंजीव फाउंडेशन यांच्या सहकार्याने २ व ३ नोव्हेंबर २०२६ रोजी औंध, पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आभा गणेश मुंडे हिने आपल्या योगासन कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विविध स्पर्धकांशी चुरशीची लढत देत तिने प्रथम क्रमांक (First Position) मिळवून सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाची अधिकृत प्रमाणपत्राद्वारे नोंद करण्यात आली आहे.
जलतरणातही राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी
आभा ही केवळ योगासनातीलच नव्हे, तर पॅरा जलतरणातीलही गुणवंत खेळाडू आहे. पॅरा जलतरण स्पर्धांमध्ये तिने यापूर्वीही अनेक सुवर्णपदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करत तिने बीड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे, जलतरणासारख्या कौशल्यपूर्ण खेळासोबत योगासन या वेगळ्या क्रीडा प्रकारातही तिने राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळवले आहे. दोन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांतील तिची ही कामगिरी तिच्या अष्टपैलू क्रीडागुणांची साक्ष देणारी आहे.
दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी यश
शारीरिक आव्हानांवर मात करत सातत्याने सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आभा आपले क्रीडा कौशल्य विकसित करत आहे. तिच्या या यशातून दिव्यांगत्व ही प्रगतीतील अडचण नसून इच्छाशक्ती आणि योग्य संधीच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते, हा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आभाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र पॅरा योगासन स्पोर्ट कमिटीच्या अध्यक्षा डॉ. सुनंदा राठी, सचिव सौ. अपर्णा पानसे, तांत्रिक संचालक श्री. सतीश मोहगावकर आणि स्पर्धा व्यवस्थापक श्री. महेश कुंभार यांनी तिचे अभिनंदन केले. आता राष्ट्रीय योगासन स्पर्धेतही आभा अशीच चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
जलतरणाच्या तलावातून योगासनाच्या व्यासपीठापर्यंत यशाचा प्रवास करणाऱ्या आभा मुंडेच्या या सुवर्णकामगिरीमुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा