अनिल अष्टेकर यांचे समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

कपिलधार येथे आज मन्मथस्वामींची २५ वी शासकीय महापूजा; शिवा संघटनेचा ३१ वा राज्यव्यापी मेळावा

अनिल अष्टेकर यांचे समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज यांची २५ वी शासकीय महापूजा आज, मंगळवार (दि. २४ नोव्हेंबर) रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. महापूजेनंतर शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा ३१ वा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्रासह विविध राज्यांतील भाविक, संत-महंत, समाजबांधव आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून दरवर्षी सुमारे पाच ते सहा लाख भाविक श्री क्षेत्र कपिलधार येथे येतात. शिवा संघटनेच्या परंपरेनुसार या पवित्र क्षेत्रात दरवर्षी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदा या मेळाव्याचे ३१ वे वर्ष असून, त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

या मेळाव्यास गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर, गुरुवर्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांच्यासह अनेक आदरणीय गुरुवर्यांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या आशीर्वचनातून समाजबांधवांना मार्गदर्शन मिळणार आहे.

मेळाव्यास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील तसेच शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

धार्मिक परंपरा, सामाजिक एकजूट आणि वीरशैव समाजाच्या संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे परळी वैजनाथ व पंचक्रोशीतील समाजबांधव, शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वीरशैव समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनिल भगवानअप्पा अष्टेकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..