मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय...
कमी पाण्यात ‘करटुले’चा प्रयोग; दीड एकरातून लाखोंच्या उत्पन्नाचा राजमार्ग धर्मापुरीतील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांची नावीन्यपूर्ण शेती; मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय धर्मापुरी प्रतिनिधी : कमी पाणी, वाढता शेतीचा खर्च आणि बदलते हवामान यामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, या परिस्थितीला संधी मानत धर्मापुरी येथील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांनी कमी पाण्यात करटुले पिकाची यशस्वी लागवड करून शेतीतील नावीन्याचा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात केलेल्या या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या प्रयोगाकडे वेधले गेले आहे. फड यांनी गट क्रमांक २००३ मधील सुमारे दीड एकर क्षेत्रावर गावरान बियाण्यांपासून करटुलेची लागवड केली आहे. साधारण चार महिन्यांच्या या पिकाला लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी फळधारणा सुरू होते. त्यानंतर दर १० ते १५ दिवसांनी तोडणी करता येते. एका हंगामात साधारण दहा तोडण्या होत असल्याने नियमित उत्पन्नाची शक्यता निर्माण होते. ठिबकवर करटुले; पाण्याची बचत क...